स्वमन्तव्यामंतव्यप्रकाश


स्वमन्तव्यामन्तव्यप्रकाश

       सर्वतंत्र सिद्धान्त अर्थात साम्राज्य सार्वजनिक धर्म जो अनादी काळापासून चालत आलेला आहे. तो सर्वच मानीत आले आहेत, आजही मानतात व या पुढेही मानत राहतील. म्हणूनच त्याला सनातन नित्य धर्म असे म्हणतात की त्याला कोणीही विरोध करू शकत नाही. अज्ञानी माणसे अथवा एखाद्या पंथाच्या लोकांकडून ज्यांची दिशाभूल करण्यात आली आहे असे लोक ज्याला खोटे समजतात व मानतात त्याचा स्वीकार बुद्धिमान करीत नाहीत. परंतु ज्याला आप्त म्हणजे सत्यमानी, सत्यवादी, सत्यकारी, परोपकारी, पक्षपातरहित विद्वान स्वीकारतात ते सर्वांच्या दृष्टीने मंतव्य म्हणजे मानण्यास योग्य असते. याउलट जे अमन्तव्य नसल्यामुळे मानण्यायोग्य नाही ते मानले जात नाही. आता जे वेदादी सत्यशास्त्रे आणि ब्रह्मदेवापासून जैमिनी मुनीपर्यंत सर्वांनी मान्य केलेले ईश्वरादी पदार्थ आहेत ते मीही मान्य करतो; आणि सर्व सज्जनांसमोर प्रकट करतो.
       जे भूत, वर्तमान व भविष्य या तीन्ही काळांत सर्वांना समान रूपाने मानण्यास योग्य आहे तेच माझे मंतव्य आहे असे मी समजतो. एखादी नवीन कल्पना अथवा मतमतांतर प्रस्थापित करणे हा माझा हेतू मुळीच नाही. परंतु जे सत्य आहे ते मानणे व मानावयास लावणे आणि जे असत्य आहे ते सोडणे व सोडावयास लावणे हे माझे अभिष्ट आहे. मी पक्षपाती असतो तर आर्यवर्त्तात प्रचलित असलेल्या मतांपैकी एखाद्या मताचा आग्रह मी बाळगला असता. परंतु आर्यवर्त्तात किंवा इतर देशांत जो काही अधर्मयुक्त व्यवहार आहे त्याचा स्वीकार आणि ज्या धर्मयुक्त गोष्टी आहेत त्यांचा त्याग मी करीत नाही व करू इच्छित नाही. कारण असे करणे मनुष्यधर्माच्या विरुद्ध आहे.
           जो मननशील असेल, आणि इतरांची सुखदुःखे व लाभहानी ही आपलीच आहेत असे समजेल तोच मनुष्य आहे.  माणसाने अन्याय करणाऱ्या बलवानालाही भीता कामा नये व धर्मपरायण दुबळ्यालाही भ्यावे. इतकेच नव्हे तर आपल्या सर्व सामर्थ्यानिशी धर्मात्म्यांचे रक्षण, उन्नती व प्रियाचरण करावे. मग ते धर्मात्मे अत्यंत अनाथ, दुर्बळ व गुणरहित असले तरी हरकत नाही. तसेच जर एखादा अधर्मी चक्रवर्ती, सनाथ,महाबलवान आणि गुणवान असला तरीही त्याचा नाश, अवनती व अप्रियाचरण माणसाने सदैव करावे, अर्थात शक्य असेल तोपर्यंत अन्याय करणाऱ्यांच्या सामर्थ्याची हानी व न्यायी लोकांच्या सामर्थ्याची उन्नती त्याने नेहमी करावी. हे करीत असतांना त्याला कितीही दारुण दुःख भोगावे लागले, किंबहुना प्राणही द्यावा लागला तरी त्याने या माणुसकीरूपी धर्माचा त्याग कधीही करू नये. या बाबतीत श्रीमान महाराजा भर्तृहरी आदींचे श्लोक उद्धृत करणे उपयुक्त होईल. 

निन्दन्तु नितिनिपुणा यदि वा स्तुवंतु,
लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् ।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा
न्यायात्पथ: प्रविचलन्ति पदं न धीराः ॥१॥ (भर्तृहरि: नीतिशतक ८४)
न जातु कामान्न भयान्न लोभाद्
धर्मं त्यजेज्जीवीतस्यापि हेतो: ।
धर्मो नित्य: सुखदुःखे त्वनित्ये, 
जीवो नित्यो हेतुरस्य तवनित्य: ॥२॥ (उद्योगपर्व ४० । ११ उत्तरार्ध, १२ पूर्वार्ध, महाभारते श्लोक ११ - १२)
एक एव सुहृद्धर्मो निधनेSप्यनुयाति यः ।
शरीरेण समं नाशं सर्वमन्यद्धि गच्छिति ॥३॥ (मनु. अ. ८ । श्लोक १७)
सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः । 
येनाSSक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानम् ॥४॥ (मुण्डकोप. मुण्डक ३ । सं. १ । श्लोक ४)
न हि सत्यात्परो धर्मोनानृतात्पातकं परम् ।
न हि सत्यात्परं ज्ञानं तस्मात्सत्यं समाचरेत् ॥ (मुण्डकोप. मुण्डक. ३ । सं. १ । श्लोक ४)

या महापुरुषांच्या श्लोकांमधून जे सांगण्यात आले आहे त्याप्रमाणे सर्वांना आचरण निश्चय केले पाहिजे. आता मी ज्या-ज्या पदार्थांचा जो अर्थ मानतो त्यांचे वर्णन थोडक्यात येथे करतो, त्यांची विस्तृत व्याख्या या ग्रन्थामध्ये त्या-त्या प्रकरणात केलेली आहे, ते पदार्थ असे : -

१. प्रथम’ ईश्वर’: - याला ब्रह्म, परमात्मा इत्यादि नावे आहेत. तो सच्चिदानन्दादि लक्षणांनी युक्त आहे. त्याचे गुण, कर्म, स्वभाव पवित्र आहेत. तो सर्वज्ञ, निराकार, सर्वव्यापक, अजन्मा, अनंत, सर्वशक्तिमान, दयाळू, न्यायकारी, संपूर्ण सृष्टीचा कर्ता, धर्ता, हर्ता, सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसार सत्य-न्यायाने फळ देणारा वगैरे लक्षणांनी युक्त आहे. त्यालाच मी परमेश्वर असे मानतो.
२. चारही’ वेद’: - (विद्या धर्मयुक्त ईश्वरप्रणीत संहिता मंत्रभाग) निर्भ्रान्त (भ्रमरहित) व स्वतः प्रमाण आहेत असे मी मानतो. ते स्वतःच प्रमाणरूप आहेत. ते प्रमाणित आहेत हे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे सूर्य व दीपक हे आपले स्वरूप स्वतःच प्रकाशित करतात आणि पृथ्वी वगैरे इतर पदार्थांनाही प्रकाशयुक्त बनवितात, त्याप्रमाणे चारही वेद स्वयंप्रकाशित आहेत. या चार वेदांचे ब्राह्मण (नावाचे ग्रंथ), सहा अंगे, सहा उपांगे, चार उपवेद, आणि ११२७ (अकराशे सत्तावीस) वेदांच्या शाखा हे सर्व वेदांच्या व्याख्या करणारे ग्रंथ ब्रह्मादी महर्षींनी रचलेले आहेत. त्यांना मी परतः प्रमाण म्हणजे वेदांना अनुकूल असल्यास प्रमाण मानतो आणि त्यांमध्ये जी वचने वेदांच्या विरुद्ध आहेत त्यांना मी अप्रमाण मानतो.
३. (‘धर्माधर्म’) जे पक्षपातरहित, न्यायाचरण सत्यभाषण आदींनी युक्त ईश्वराज्ञा आहे, जे वेदांच्या अविरुद्ध आहे त्याला मी ’धर्म मानतो; आणि जे पक्षपातरहित अन्यायचरण मिथ्याभाषण आदी ईश्वरी आज्ञेचा भंग करणारे आहेत, वेदांच्या विरुद्ध आहे त्याला मी ’अधर्म मानतो. 
४. (जीव) जो इच्छा, द्वेष, सुख-दुःख, ज्ञान आदी गुणांनी युक्त, अल्पज्ञ, नित्य आहे त्याला मी जीव’ मानतो. 
५. (जीव आणि ईश्वर) जीव आणि ईश्वर हे स्वरूप व वैधर्म्य यांमुळे भिन्न आणि व्याप्यव्यापक व साधर्म्य यामुळे अभिन्न आहेत. अर्थात ज्याप्रमाणे आकाशापासून मूर्तिमान द्रव्य कधी भिन्न नव्हते, नाही व नसेल आणि कधी एक नव्हते, नाही व नसेल, त्याचप्रमाणे परमेश्वर व जीव हे व्याप्य-व्यापक, उपास्य-उपासक आणि पिता-पुत्र आदी संबंधयुक्त मानतो.
६. अनादी पदार्थ’ तीन आहेत. एक ईश्वर, दूसरा जीव, तिसरी प्रकृति म्हणजेच जगाचे कारण. यांनाच नित्य असेही म्हणतात. जे पदार्थ नित्य आहेत त्यांचे गुण, कर्म व स्वभावही नित्य आहेत.
७. ‘प्रवाहाने अनादी संयोगाद्वारे जी द्रव्यें, गुण व कर्मे उत्पन्न होतात ती वियोगानंतर उरत नाहीत. परंतु प्रथम संयोग होतो ते सामर्थ्य त्यांच्यात अनादी असते, त्या सामर्थ्यामुळे पुनः संयोग होईल आणि वियोगही होईल. या तीन्हींना मी प्रवाहाने अनादी मानतो.
८. ‘सृष्टि वेगवेगळ्या द्रव्यांचा ज्ञान-युक्तिपूर्वक मेळ होऊन नानारूपे धारण करणे.
९. ‘सृष्टीचे प्रयोजन’ हे आहे की ज्यात ईश्वराच्या सृष्टिनिमित्त गुण, कर्म, स्वभावाची सार्थकता होणे जसे एकाने दुसऱ्याला विचारले की, "डोळे कशासाठी आहेत?" त्याने सांगितले की, "पाहण्यासाठी". त्याच प्रमाणे सृष्टी करण्याच्या ईश्वराच्या सामर्थ्याची सार्थकता सृष्टी (निर्मित) करण्यात आहे. तसेच जीवांच्या कर्माचा यथावत भोग करणे इत्यादि.
१०. ‘सृष्टि सकर्तृक’ आहे. तिचा कर्ता पूर्वोक्त ईश्वर आहे. कारण सृष्टि रचनेच्या प्रत्यक्षाद्वारे आणि जड (अचेतन) पदार्थात स्वतः होऊन यथायोग्य बी-बियाण्यांचे आकार धारण करण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे सृष्टिचा ‘कर्ता’ अवश्य आहे.
११. ‘बंध’ सनिमित्तक म्हणजेच अविद्या निमित्त (बंधाचे कारन अविद्या ही) आहे. सारी पापकर्मे ईश्वराव्यतिरिक्त उपासना करणे, अज्ञान आदि सर्व दुःखदायक आहेत. म्हणूनच हा ‘बंध’ आहे की ज्याची इच्छा नसते परंतु तो भोगवा लागतो.
१२. ‘मुक्ति’ सर्व दुःखांतून मुक्त होवून बन्दरहित सर्वव्यापक ईश्वराच्या सृष्टीत स्वेच्छेने विचरण करणे आणि ठरलेल्या काळापर्यंत मुक्तीचा आनंद उपभोगून पुनः जगात येणे.
१३. ‘मुक्तीची साधने’ ईश्वरोपासना म्हणजे योगाभ्यास, धर्मानुष्ठान ब्रम्हचर्य यांच्याद्वारे विद्या प्राप्त करणे, आप्त विद्वानांचा सत्संग, सत्यविद्या, सुविचार आणि पुरुषार्थ आदि आहेत.
१४. ‘अर्थ’ जो धर्मानेच प्राप्त केला जातो तो अर्थ होय; आणि जो अधर्माने सिद्ध केला जातो तो ‘अनर्थ’ होय.
१५. ‘काम’ धर्म व अर्थ यांच्या साह्याने प्राप्त केला जातो तो ‘काम’ होय.
१६. ‘वर्णाश्रम’ हे गुणकर्माच्या योग्यतेवर आहे असे मी मानतो.
१७. ‘राजा’ जो शुभ गुण, कर्म व स्वभाव यांनी प्रकाशित, पक्षपातरहित न्याय धर्माचे सेवन करतो, प्रजेशी पित्याप्रमाणे वागतो आणि प्रजाजनांना आपल्या मुलांसमान मानून उन्नती आणि त्यांचे सुख वृद्धिंगत व्हावे यासाठी सतत प्रयत्न करणारा असतो.
१८. ‘प्रजा’ जी पवित्र गुण, कर्म व स्वभाव यांना धारण करून पक्षपातरहित न्याय धर्माचे सेवन करून राजा व प्रजा यांची उन्नती चिंतिते, राजद्रोह न करता राजाशी मुलांप्रमाणे वागतो ती ‘प्रजा’ होय.
१९. (‘न्यायाकारी’) जो नेहमी विचार करून असत्याचा त्याग व सत्याचा स्वीकार करतो, अन्याय करणाऱ्यांचे पारिपत्य करतो, न्याय करणाऱ्यांना वाढवितो, आपल्या आत्म्याप्रमाणे सर्वांचे सुख इच्छितो तो ‘न्यायाकारी’ होय. त्याला मीसुद्धा योग्य मानतो.
२०. मी विद्वानांना ’देव' अविद्वानांना असुर, पाप्यांना ’राक्षस' अनाचार करणाऱ्यांना ’पिशाच' समजतो.
२१. ('देवपूजा') विद्वान, माता, पिता, आचार्य, अतिथी, न्यायी राजा धर्मपरायण लोक, पतिव्रता स्त्री आणि पत्नीव्रती पती यांचा सत्कार करणे ही ’देवपूजा' म्हटली जाते. या विपरीत जी पूजा तिला मी अदेवपूजा समजतो. या व्यक्तींना मी पुज्य समजतो आणि इतर दगडाधोंडे आदिंच्या जड (अचेतन) मूर्तींना मी सर्वथा अपूज्य समजतो.
२२. ’शिक्षा' ज्यायोगे विद्या, सभ्यता, धर्मापरायणता, जितेंद्रियता, वगैरे वृद्धिंगत होतात आणि अज्ञान वगैरे दोष दूर होतात त्याला ’शिक्षा' म्हणतात.
२३. ’पुराण' ब्रह्मादींनी रचलेले जे ऐतरेयादी ब्राह्मण ग्रंथ आहेत त्यांनाच मी पुराण, इतिहास, कल्प, गाथा व नाराशंसी नावाने मानतो. भागवत वगैरेंना नाही.
२४. ’तीर्थ' ज्यांच्या योगे दुखांतून पार पडता येते अशी सत्यभाषण, विद्या, सत्संग, यमादि योगाभ्यास, पुरुषार्थ, विद्यादान इत्यादी जी शुभ कर्मे आहेत त्यांनाच मी तीर्थ समजतो. इतर जलस्थलादींना नाही.
२५. ’प्रारब्धाहुन पुरुषार्थ श्रेष्ठ' यासाठी आहे की, पुरुषा र्थामुळे संचित, प्रारब्ध बनत असते. पुरुषार्थ सुधारला की सर्व सुधारते व पुरुषार्थ बिघडला की सारे बिघडते म्हणून प्रारब्धाहुन पुरुषार्थ श्रेष्ठ आहे.
२६. ’माणसाने' सर्वांशी यथायोग्य स्वात्मवत वागावे. इतरांचे सुख, दुःख, हानी, लाभ ह्यात वागणे श्रेष्ट याउलट वर्तन हे वाईट समजतो.
२७. ’संस्कार' ज्यायोगे शरीर, मन व आत्मा उत्तम बनतात त्याला ’संस्कार' असे म्हणतात. ते गर्भाधानापास्सून अंत्येष्टी पर्यंत सोळा प्रकारचे संस्कार आहेत. यास कर्तव्य समजतो. मात्र दहनानंतर मृतकासाठी काहीही न केले पाहिजे.
२८. ’यज्ञ' ज्यात विद्वानांचा सत्कार, यथायोग्य शिल्प अर्थात रसायनांदि जो की पदार्थविद्येचा वापर करणे, विद्यादी शुभ गुणांचे दान, अग्निहोत्रादिद्वारा वायू, वृष्टि, जल, औषधींची पवित्रता करून सर्व जीवांना सुखी बनविणे म्हणजे ’यज्ञ' होय. ती गोष्ट उत्तम आहे, समजतो.
२९. श्रेष्ट माणसांना ’आर्य' व दुष्टांना ’दस्यू' म्हणतात. मीही तसेच मानतो.
३०. आर्यावर्त्त' देश हे या भूमीचे नाव यासाठी आहे की सृष्टीच्या प्रारंभापासून आर्य लोक रहात आले आहेत. मात्र याच्या चतुःसीमा उत्तरेस हिमालय, दक्षिणेस विंध्याचल, पश्चिमेस अटक व पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदी अशा आहेत. या चतुःसीमा असणाऱ्या देशाला आर्यावर्त्त' असे म्हणतात आणि जे लोक या प्रदेशात निरंतर रहात आले त्यांनाही ’आर्य' असे म्हणतात.
३१. ('आचार्य') सांगोपांग वेदविद्यांचा जो अध्यापक सत्याचाराचे ग्रहण व मिथ्याचाराचा त्याग करवितो त्याला ’आचार्य' असे म्हणतात.  
३२. ('शिष्य') जो सत्य शिक्षण व विद्या यांचे ग्रहण करण्यास योग्य, धर्मात्मा, विद्याभ्यासाची इच्छा बाळगणारा व आचार्यांच्या मनाप्रमाणे वागणारा असतो त्याला ’शिष्य' असे म्हणतात.
३३. ’गुरु' माता, पिता आणि जो सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करवितो तो सुद्धा ’गुरु' म्हटला जातो.
३४. ’पुरोहित' जो यजमानाचा हितकर्ता व सत्याचा उपदेश करणारा असतो.
३५. 'उपाध्याय' जो वेदांचा एक भाग किंवा अंगे शिकवतो तो.
३६.'शिष्टाचार' धर्माचरणपूर्वक ब्रह्मचर्याने विद्याध्ययन करणे, प्रत्याक्षादि प्रमाणांद्वारा सत्यासत्याचा निर्णय करून सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करणे हाच शिष्टाचार आणि जो याचे पालन करतो तो ’शिष्ट' म्हटला जातो.
३७. प्रत्यक्षादी आठ ’प्रमाणांना' सुद्धा मानतो.
३८. ('आप्त') जो यथार्थवक्ता, धर्मात्मा व सर्वांच्या सुखासाठी प्रयत्न कतो त्यालाच ’आप्त' असे म्हणतो.
३९. 'परीक्षा' पाच प्रकारची असते. पहिली परीक्षा ज्यात ईश्वर, त्याचे गुण-कर्म-स्वभाव व वेदविद्या, दुसरी प्रत्याक्षादी आठ प्रमाण, तिसरी सृष्टीक्रम, चौथी आप्तांचे व्यवहार आणि पाचवी आत्म्याची पवित्रता, विद्या. या पाच परीक्षांच्याद्वारे सत्यासत्याचा निर्णय करून सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग केला पाहिजे.
४०. 'परोपकार' ज्यायोगे सर्व मानवाचे दुराचार व दुःखे दूर आणि श्रेष्टचार व सुखे वृद्धिंगत होते त्याच्या करण्याला ’परोपकार' म्हणतो.
४१. ’स्वतंत्र'‘परतंत्र' जीव हा आपल्या कर्मांत स्वतंत्र आणि कर्माची फळे भोगण्यात ईश्वरी व्यवस्थेमुळे परतंत्र. त्याचप्रमाणे ईश्वर हा आपली सत्याचार आदि सर्व कामे करण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे.
४२. ’स्वर्ग' विशेष सुखांचा भोग आणि त्याची सामग्रीची प्राप्तीचे नाव ’स्वर्ग' आहे.
४३. ’नरक' विशेष दुःख, भोग आणि त्याची सामग्रीची प्राप्ती होणे आहे हा ’नरक'.
४४. ’जन्म' शरीर धारण करून प्रकट होणे म्हणजे ’जन्म' होय. त्याचे पूर्व, पर व मध्य तीन प्रकारचा भेद मानतो. 
४५. शरीराच्या संयोगाने नाव ’जन्म' आणि त्याच्या वियोगाला ’मृत्यू' म्हणतात.
४६. ’विवाह' नियमांप्रमाणे प्रसिद्धीने आपल्या इच्छेने पाणिग्रहण करणे याला ’विवाह' म्हटला जातो.
४७. ’नियोग' विवाहानंतर पतीच्या निधनादी वियोगात अथवा नपुंसक्त्वासारख्या कायमच्या रोगामुळे आपत्काली आपल्या वर्णाच्या किंवा आपल्याहून उत्तम वर्णाच्या  स्त्री किंवा  पुरुषाबरोबर संतानोत्त्पत्ति करणे.  
४८. ’स्तुती' गुणगान, श्रवण आणि ज्ञान होणे म्हणजे ’स्तुती' याचे फळ प्रेमादि होते.
४९. ’प्रार्थना' आपल्या सामर्थ्यानंतर ईश्वराकडून जी विज्ञानदी वगैरे प्राप्त होतात, त्यांच्यासाठी ईश्वराकडे याचना करणे याचे फळ निरभिमान वगैरे होते.
५०. ’उपासना' जसे ईश्वराचे गुण, कर्म, स्वभाव पवित्र आहेत तसे आपले बनविणे, ईश्वराला सर्वव्यापक व स्वतःला व्याप्य समजून आपण ईश्वराजवळ व ईश्वर आपल्याजवळ असा निश्चय योगाभ्यासाद्वारे साक्ष्यात करणे. याला ’उपासना' म्हटली जाते. ज्ञानोन्नती वगैरे हि उपासनेची फळे आहेत. 
५१. ’सगुणनिर्गुणस्तुतीप्रार्थनोपासना' जे-जे गुण परमेश्वरात आहेत, त्या गुणांनी तो युक्त आहे आणि जे-जे गुण त्याच्यात नाहीत त्यांच्यापासून तो दूर आहे समजून प्रशंसा करणे, याला सगुणनिर्गुणस्तुती. शुभ गुणांच्या प्राप्तीची इच्छा ईश्वराकडे बाळगणे आणि दोषांपासून दूर होण्याच्या कामी परमात्म्याचे साह्य मागणे, ही सगुणनिर्गुण प्रार्थना होय. परमेश्वर हा सर्व गुणांनी युक्त व सर्व दोषरहित, हे ओळखून आपल्या आत्म्याला परमेश्वर व त्याची आज्ञा यांना समर्पित करणे ही सगुणनिर्गुणोपासना' म्हटली जाते.
हे स्वसिद्धांत मी संक्षेपाने नमूद केले आहेत. त्यांचे सविस्तर विवेचन या ’सत्यार्थप्रकाश' ग्रंथांच्या वेगवेगळ्या प्रकरणांत आलेले आहे. तसेच ’ऋग्वेदादिभाष्यभूमिका' वगैरे ग्रंथांमध्येही लिहिली आहे. अर्थात जी-जी गोष्ट सर्वांच्या दृष्टीने माननीय आहे तीची मान्यता. जसे खरे बोलणे हे सर्वांच्या दृष्टीने चांगले आणि खोटे बोलणे वाईट अशा सिद्धांताना मी स्वीकार करतो आणि मतमतान्तारांची जी एकमेकांविरुद्ध भांडणे आहेत ती पसंत करीत नाही. कारण या मत-पंथियांनी आपापल्या मताचा प्रचार करून मनुष्यांना त्यात गुंतवून एकमेकांचे शत्रू बनविले आहे. म्हणून त्या गोष्टींचे खंडन व संपूर्ण सत्याचा प्रचार करून सर्वांमध्ये एकमत स्थापन करून, द्वेष त्याग करून, परस्परांत दृढ प्रेमयुक्त करून आणि सर्वांना सर्वांकडून सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्न व अभिप्राय आहे. सर्वशक्तिमान परमात्म्याची कृपा, साह्य आणि आप्तजनांची सहानुभूतीने हा सिद्धांत संपूर्ण विश्वामध्ये लवकरच पसरो, ज्यामुळे लोक सहजपणे धर्म, अर्थ, काम व मोक्षाची सिद्धि करून सदैव उन्नत व आनंदित होत राहावे. हाच माझा मुख्य उद्देश आहे. 

          अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु
          ओ३म् । शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्वर्य्यमा ।
          शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुरुक्रमः ।
          नमो ब्रह्मणे । नमस्ते वायो । त्वमे प्रत्यक्षं ब्रह्मासि ।
          त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्मवदिषम् ऋतमवदिषम् सत्यमवदिषम् ।
          तन्मामावित् तद्वत्त्कारमावीत् आवीन्माम् आवीद्वत्त्कारम् ।
          ओ३म् शान्तिः शान्तिः शान्तिः ।। तै.आ. ७।१२

इति श्रीमत्परमहंसपरिव्रा­जकाचर्य्याणां परमविदुषां
श्रीविरजानन्दसरस्वती­स्वामिनां शिष्येण श्रीमद्दयानन्दसरस्वतीस्वामिना
विरचितः स्वमन्तव्यामन्तव्यासिद्धान्तसमन्वितः सप्रमाणयुत्त्कः
सुभाषाविभषितः
सत्यार्थप्रकाशोऽयं ग्रन्थः सम्पूर्त्तिमगमत् ।।

No comments:

Post a Comment